आज संध्याकाळी सहज फिरायला बाहेर पडलो. Office मध्ये थोडं काम सुद्धा होतं, ते उरकून टाकावं म्हंटलं. आमची colony म्हणजे फार छान. मस्तं झाडं, बागा, हिरवळ. मुलं कायम बागेत खेळणार.
आमच्या घराच्या समोर रहाणाऱ्या दोन चिटुकल्या. वय वर्षे तीन आणि चार. सतत दंगा सुरु. त्यांना माझ्यामध्ये काय दिसतं ते मला कधी समजलं नाही (आणि समजणार देखिल नाही!), पण त्या मला कायम "कबुतर" म्हणूनच हाक मारणार. आम्ही साधे लोक ना. आमची त्या खूप चेष्टा करणार. पण आमचा त्यांच्यावर खूप जीव. मस्तं दिवस जाणार आमचा - त्यांना फक्तं बघुनच. पण पोरी असल्या भारी, कि कधी आमच्या जवळ येणार नाहीत. आम्हाला बघून कबुतर कबुतर म्हणून पळून जाणार. कधी कधी तर 'कौवा' म्हणणार आम्हाला. अतिशय गोड मुली त्या :)
पण आज आम्हाला बघुन त्या पळुन गेल्या नाहीत. अहो आश्चर्यम! उलट त्या जवळ आल्या, हात पुढं करुन म्हणाल्या, "कबुतर जी, Happy friendship day!!" सगळं जग एक-दोन सेकंद स्तब्धं झालं आमच्या पुढं. काय बोलावं काही समजेना. श्वास रोखल्यासारखं व्ह्यायला लागलं. मग आम्ही धीर केला आणि कसंबसं म्हणालो "Happy friendship day Navya and you cute little girl (त्या छकुलीचं नाव देखिल आम्ही विसरलो!). हमे एक बात बताओ - ये friendship day क्या है?" तर आम्हाला काही समजायच्या आतच त्या आमचा हात सोडुन पळाल्या... "कबुतर जी को friendship day नही पता, कबुतर जी को friendship day नही पता" असं ओरडत!
आम्ही हाताकडे बघतच बसलो. त्यावर एक छानशी नक्षी उठली होती - "मैत्री"ची!