Saturday, May 06, 2006

वाचाल तर वाचाल !

ट्युलिप हे नाव ऐकलं कि मनात काय बरं येतं? तर फुल. एक सुंदर फुल. आमचे आंग्ल नातेवाईक या फुलाच्या नानाविध गोष्टी आम्हाला सांगणार, फोटो दाखवणार आणि आम्ही ते विलक्षण फोटो पाहून परदेशाच्या रंगी-बेरंगी गोष्टी मनात रंगवणार. रंगीतच. बेरंगी नव्हे. असो.

पण आत्ता या क्षणी जर कोणी आमच्यासमोर त्या फुलाचं नाव घेतलं, तर आम्हाला धडकीच भरणार. का? कारण ट्युलिप नामक एका blogger कडून आमच्याकडे एक महा-भयंकर 'tag' सोपवण्यात आला आहे. आता आमच्यासारख्या शूर सरदाराला महा-भयंकर वाटणारी काही गोष्टं असेल का? होय. कारण या tag मध्ये लिहायचं आहे आमच्या आणखी काही खास मित्रांबद्दल. नाही. या वेळेला पक्षी नाहीत. हे मित्रं म्हणजे "पुस्तंकं". आमचे लहानपणापासुनचे खास दोस्तं. मग आता खास दोस्तांबद्दल लिहायचं तर त्यात अवघड ते काय? पण अवघड गोष्टं अशी, कि हे खास मित्रं इतके जास्तं आहेत कि कुणा-कुणाबद्दल आणि किती-किती लिहायचं? यक्षंप्रश्नच हो.

त्यामुळे मित्रंहो, ट्युलिप या एका मित्राची मर्जी राखण्यासाठी काही खास मित्रांना मला 'नाराज' करावं लागणार आहे. खास दोस्तांची माफी मागायची नसते हे मला माहित आहे. मग होउन जाउन्दे तर....

१) सध्या वाचनात असलेले / शेवटचे वाचलेले / विकत घेतलेले पुस्तक

सध्या तरी एक देखिल मराठी पुस्तक वाचनात नाही, पण आम्हाला त्याच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. आता का ते विचारा.... त्याचं कारण असं, कि सध्या बरिच english पुस्तकं वाचनात आहेत. गुडगाव सारख्या जागेत मराठी पुस्तकं मिळायची म्हणजे महाकठीण काम. पण आतली गोष्टं अशी आहे, की आम्ही मराठी पुस्तकं घरी गेल्यानंतरच वाचतो. जसं काही खास मित्रांना घरी गेल्यावरच भेटणं होतं, तसं! त्यातली मजा वेगळीच आहे, ना? इतक्या खास दोस्तांना असल्या जागेत आणायला आमचं मन तयारच होत नाही हो! असा त्यांचा (आणि माझा) तोरा!!

तसं सांगायचंच झालं तर शेवटचं पुस्तक काल विकत घेतलं - रबिन्द्रनाथांच्या निवडक कथा ( in English)

२) शेवटचे वाचलेले पुस्तक

छंदांविषयी थोडेसे - अनिल अवचट

आनिल अवचट म्हणजे एक विलक्षण वल्ली! सर्वग़ुण संपन्न, प्रभावी, तेजस्वी असं व्यक्तिमत्वं. आम्ही म्हणजे त्यांचे निस्सिम भक्तं! त्याची नियमित पुजाच करणार म्हणा ना! छंदांविषयी थोडेसे मात्रं जरा off-beat पुस्तक. एका शौकिन माणसाला दुसरा शौकिन माणुसच समजू शकतो हे आम्हाला कळून चुकलं. हे पुस्तक वाचावं आणि "हरहुन्नरी" या शब्दाचा अर्थं पुन्हा समजुन घ्यावा! असं विलक्षण पुस्तक.

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके

वनवास, शारदा संगित, पंखा, झुंबर...
बर बर... प्रकाश नारायण संतांना आपण बाजुला ठेवणं गरजेचं आहे! नाहीतर ८०% यादी तर त्यातंच भरेल!

मग ओंजळधारा, हिरवे-रावे, निळा-सावळा, रक्तचंदन, पारवा, काजळमाया, रमलखुणा, माणंसं - अरभाट आणि चिल्लर, अम्रुतफुले, मुग्धाची रंगीत गोष्टं, बखर बिम्मची या भल्या मोठ्या यादीला काय हो म्हणायचं! जी. ए. ना सुध्दा बाजुला ठेवायला लावणार तुम्ही मला.

म्हणजे द.मा. मिरासदार, मारुती चित्तमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर, सई परांजपे, गौरी देशपांडे या लोकांचं सुध्दा नाव घ्यायचं नाही. पुलं ना तर विसरुनच जायचं! सगळे देवासमान!!

४) अद्याप वाचायची आहेत अशी पाच पुस्तके

आमच्याच भाषेत सांगयचं झालं तर आम्ही "भुरटे" वाचक! उगच कुठं चार पुस्तकं वाचली नाही वाचली कि कॉलर ताठ करुन शायनिंग मारणार! समुद्रात मोती किती, आणी त्यातला एक तुमच्याकडं असंला की तुम्ही काय जगावर राज्यं करायला निघालात! वा रे वा... भारी आहे बाबा!

पाच नाहीत, पन्नास आहेत... पाच हजार आहेत...
बर बर... alt-F4 दाबायच्या ऐवेजी पुढचा paragraph वाचा. कदाचित काहीतरी "घेन्यासरखं" मिळेल!

५) एका प्रिय पुस्तका विषयी थोडेसे -

आम्ही लहानपणी खुळं होणार ते एका मुलीसाठी! "तोत्तोचान" तिचं नाव. जपान मधल्या एका लहानशा गावात एका visionary माणसानी सुरु केलेल्या एका तितक्याच visionary शाळेत जाणारी, अवती-भोवतीच्या गोष्टींबद्दल कुतुहल असणारी एक चिमुरडी मुलगी. अगदी आमच्याच सारखी. आणि तिच्याबद्दल, तिच्या त्या ग्रेट शिक्षकाबद्दल आणि तिच्या पालक-मित्र-मैत्रिणी-कुत्र्याबद्दल लिहिलेलं हे पुस्तक. मुळचं जपानी भाषेत, आमच्याकडे आलं मराठी मध्ये भाषांतर होउन.

अतिविलक्षण.

Original पुस्तकात अप्रतिम चित्रं. प्रेमात पडावं अशी ती गोष्टं. सध्या ते पुस्तक मिळत नाही, आणि मिळालंच तर त्या चित्रांशिवाय मिळतं. पण जर वाचलं नसेल, तर alt-F4 मारा, माझ्यासारख्या एका वेड्याच्या मनातले भरकटलेले विचार वाचण्यापेक्षा ते पुस्तक घेउन वाचा!

जाता जाता, अनुवादित पुस्तकांवरुन आठवलं... "देनिसच्या गोष्टी", "इवान", "रशियन परिकथा" आणि similar contemporary Russian पुस्तकं, जी मराठीत अनुवादित झाली आहेत, ती तर आमचे भयानक खास दोस्त हॉं. त्यांच्याशी जर तुमची ओळख नसेल तर अवघड आहे तुमचं. कधीतरी आठवण करा, त्यांच्याशी ओळख करुन देतो!

सम्या : खो!

ट्युलिप : tag बद्दल धन्यवाद :) आणि हो, आमच्या वाचनाला आणि लेखनाला जळमटं लागली असतील, पण मनाला नाहीत हो :D

Similar tag in English HERE.