Thursday, April 27, 2006

वादळ

आज सकाळी ऑफिसला येताना Indian Robin (भारतिय दयाळ) चं दर्शन झालं. पठ्ठ्या गवतात आंघोळ करत होता... मला त्याचा फार हेवा वाटला. गुडगावासारख्या महाभयंकर गरम प्रदेशात सक्काळी सक्काळी देखिल उकाडा म्हणजे विचारु नका. त्यातंच आठवड्याचा हा मधला दिवस. त्यामुळं भर सकाळीच office मध्ये घालवायच्या असलेल्या दहा तासांच्या विचारानी डोस्कं उठून ठणा-ठण घंटा-बिंटांची बडवा-बडवी आत सुरु झालेली. आणि हा छोटू मात्रं निव्वान्तपणे स्नानाची मजा लुटत होता. एक मिनिट वाटलं कि एक दगड टाकून उडवुन लावावं त्याला. पण सद्सदविवेकबुद्धी नामक कळ डोक्यात वाजायला लागली. आता कळ आहे म्हणजे थांबणं तर भागंच. थांबलो.

आता थांबलोच आहे तर बघुया म्हंटलं काय करताहेत टिक्कोजीराव.. तर त्यानी जरा माझ्याकडं बघितल्या-नं-बघितल्यासारखं केलं आणि गेले की हो उडून! पण आमचा ego त्याला ऐकतोय होय! आम्ही सुद्धा बसलो ठाण मांडून तिथं. आणि मग एक एक गोष्टी लागल्या मनात यायला.

तर हा दयाळ म्हणजे आमच्या खास दोस्तांपैकी एक असलेला. तसं बघायला गेलं तर सगळेच पक्षी म्हणजे आमचे लहानपणापासूनचे जिवलग दोस्त. ते चड्डी घालत नाहीत ही गोष्टं वेगळी! ...आणि नाहीतर परक्याला बघुन आमच्यासारखं कोणी थांबेल का? आणि परक्याबद्दल असलं कोणी बोलेल का? म्हणजे दोस्तंच ना आपला तो. लगेच कळी खुलली आमची.. ते पक्षीनिरिक्षणाचे दिवस आठवले. भारलेले दिवस. सायकली काढून, दहा दहा किलोमिटर दामटून Pheasant Tailed Jacana आणि Ashy Wren Warblers च्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याची दहा दहा दिवस - दहा दहा तास रोज वाट बघण्याचे दिवस. परवडत नसताना nikkon च्या binoculars साठी अवाजवी हट्टं करायचे दिवस. Flamingos साठी केलेल्या मायणीच्या सहलींचे दिवस. टिटव्यांची घरटी शोधताना दोन दोन टिटव्यांकडून खालेल्या माराचे दिवस. गरुडासारख्या अवाढव्य पक्ष्याशी देखिल खास दोस्ती केल्याचे दिवस. त्याच्या इवल्याश्या पिल्लांना कच्या मटणाचा एक एक घास भरवल्याचे दिवस, आणि त्या मटणाच्या मागे "बामण" दोस्तांना बाटवल्याचे दिवस. पावसाळी सहलींच्या वेळी camera आणि binoculars डोक्यावर घेउन पुरच्या पाण्यात ओढे पार केल्याचे दिवस. सालीम अलींची भक्ती-भावानी पूजा केल्याचे दिवस. त्यांच्या अद्भुत गोष्टी खुळं होउन ऐकल्याचे दिवस. The book of Indian Birds (किंमत केवळ तिनशे रुपये!) साठी मामा-आजोबांच्या मागे वेड्यासारखे लागल्याचे दिवस. कुठल्यातरी एका सहलीच्या वेळी एस.टी मध्ये कुण्या एका पाच वर्षांनी मोठ्ठ्या मैत्रिणीनी म्हंटलेल्या "अजिब दास्ताँए है ये.." गाण्यासाठी तिच्या प्रेमात पडण्याचे दिवस. हरवलेल्या नोंदवह्यांसाठी रात्रं-रात्रं रडल्याचे दिवस.

असं काही-बाही आठवून मनात कालवा-कालव सुरु झालेली. सगळं जग उलटं सुलटं फिरायला लागलेलं. नोंदवह्यांसारखे हे मित्रं आणि या आठवणी सुद्धा हरवतील काय असं काहीतरी वाटायला लागलं. थोडं मोठं झाल्यावर bird-watching च्या बदललेल्या definitions आठवल्या. मित्रांनी केलेल्या चेष्टा आठवल्या. office मध्ये वाट पहाणाऱ्या colleagues आणि boss चे 'सॅड' चेहेरे आठवले. मग परत सगळं जग तसंच उलट्या दिशेत फिरलं, आणि एकदम वादळ शांत झाल्यासारखं झालं. ऑफिसला जायला पाहिजे हे लक्षात आलं. दयाळसाहेब तिथेच बसलेले होते. त्यांना म्हटलं "परत भेटू. मी fighter आहे".

त्यांनी फक्त हसून अंगाला एक मस्तं झटका दिला.

6 Comments:

At 5:38 PM, April 27, 2006, Anonymous Anonymous said...

छानच!

 
At 7:29 PM, April 27, 2006, Blogger Tulip said...

सही पोस्ट है भिडू! लिखते रहो!!

पक्षांबद्दल लिही ना परत अजून.

 
At 11:04 PM, April 27, 2006, Blogger Sumedha said...

वा! फारच सुरेख.

 
At 3:54 AM, April 28, 2006, Blogger Nandan said...

मस्त लेख, ओजस. पाखरू आणि जुन्या आठवणी यांचा संबंध असतोच.

 
At 1:07 AM, June 05, 2006, Blogger A said...

Liha re bhau lavakar...

 
At 3:14 PM, October 07, 2006, Anonymous Anonymous said...

kya baat hai, chhaan!

 

Post a Comment

<< Home