Tuesday, October 31, 2006

वजन

आम्ही शाळेत असताना पट्टीचे पठ्ठे "जलतरणपटू" होतो. म्हणजे शाळा कमी आणि बाकीच्याच भानगडी जास्तं असणार आमच्या. कधी कधी तर लोक ते सगळं बघुन कोड्यातच पडणार. तसं आम्ही कोडी पण सोडवायचो तेंव्हा, पण असली नाही बा! सायकल हा आमचा आणखी एक छंद. रोजच्याला आम्ही तीन-चार किलोमिटर सायकली "ताणवत" पोहयच्या तलावावर जाणार. मग तिकडं एक 'सर' आम्हाला नाकात दम येईपर्यंत व्यायाम करायला लावणार. ते व्यायाम सुद्धा महविचित्रं - आम्ही ज्या 'नादिया' नावाच्या रशियन परीचे जिम्नॅस्टिक्सचे धडे मुग्धं होऊन कॅसेट्सवर बघायचो, तिच्यापेक्षा विलक्षण कसरती आम्ही त्या तलावाच्या काठावरती करणार.

हे सगळं ठीक. पण खरी मजा पहिल्या-पहिल्यांदा येणार. प्रॅक्टिस बघायला आलेली ती दोन-पाचशे लोकं, कुणाच्या चिमुरड्या बहिणी, पोहायला नं येणारी शेंबडी पोरं, तालमीतल्या पैलवानांपेक्षा 'डेंजर' दिसणारे काठ्याधारी गार्ड, आमच्या संस्थानाचे महाराज (सगळे त्यांना सरकार म्हणणार), हवेत उडणाऱ्या घारी, कर्कश्य शिट्ट्या मारत हातात स्टॉपवॉच घेउन मागं-मागं फिरणारे ते आक्राळविक्राळ सर. अशी सगळी बोंबाबोंब असायची तिकडं. या असल्या सगळ्या गोष्टी आम्हाला राक्षसासारख्या खायला आल्यासारख्या वाटाणार, पण त्यामुळे आम्ही पाण्यात तोंड घालून दणादणा हात-पाय मारणार आणि त्यामुळं आमच्यासारख्या साध्या-वेंधळ्या पोरग्याचा एक पठ्ठ्या जलतरणपटू झाला. म्हणजे एवढा पण ही भारी नाही, शाळेत पोरं मात्रं कधी कधी म्हणणार - 'च्यायला ते ओज्या फ्रिष्टाईल लई बेष्ट मारतय हाँ. स्विमर है ते!'. बास. तेवढंच.

मग एकदा कधीतरी आमची निवड 'स्टेट लेवल चँपियनशिप' साठी झाली. चार पोरांच्या फ्रि-स्टाईल रिले मध्ये आमचा नंबर पहिला असणार. खऱं तर चार नंबर एकदम बेष्ट प्लेयर, एक नंबर पण चांगला आणि दोन आणि तीन नंबर जरा साधी, असं कायम असणार, पण आम्ही फार पंटर. साडे माडे तीन नंतर शिट्टी ऐकल्या ऐकल्या आम्ही पाण्यात सूर मारायचो. एकदम बेष्टात बेष्ट पोरांपेक्षा सुद्धा बेष्टं! त्यामुळे आम्हाला रिलेमध्ये कायम एक नंबर देणार!

मग सगळं ठरलं. आमच्या 'टीम' बरोबर आमचे इतिहासाचे गुळवणी सर यायचे होते. हे सर म्हणजे एक्क नंबर वल्ली! त्यांनी पुस्तक टेबलावर ठेऊन तोंडाचा पट्टा सुरु केला की आम्हाला असं वाटायचं की जसं काठी मारुन मारुन पळवायचं सायकलचं जुनं टायर पळायलंय. रिकामी दोऱ्याची रिळं जमिनीवरनं घरंगळत सोडल्यावर जशी जातात तसे त्यांचे शब्दं आमच्या कानावर येणार. झब्बा-लेंगा-दाढी-ढेरी. "हाँ.. बडबड नाही करायची!" हे शब्दं एका तासात ते किमान साठ-सत्तरदा तरी म्हणणार, आणि आम्ही सूर्य दक्षिणेला उगवल्यामुळे कधीतरी चुकून शाळेत जाणार, तेंव्हा शेवटच्या बेंच वर बसून ते वेड्यासारखं मोजत रहाणार. मुहंमद तुघलक की घौरी राहिले बाजूला. आम्हाला तीन वर्षं कुठल्याही पुस्तकात बाबरी मशिद कुठं दिसली नाही, पण त्याबद्दल काही-बाही ते आम्हाला कायम सांगणार. त्यावर हातोड्याचे घाव घालून आपण ती कशी पाडली, आणि नंतर कसे घामाघूम झालो होतो हे त्यांनी आम्हाला एक लक्ष वेळेला तरी सांगितलेलं - त्यामुळे सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, भगतसिंह यांच्यासारखे आपले गुळवणी सर सुद्धा खंदे स्वातंत्र्यसैनिक आहेत असं काही की आम्हाला वाटायला लागलेलं. असले ते.

मग आम्ही एकदाचे निघालो. मस्तं ट्रेनचा लांबलचक प्रवास, आईनी दिलेला फराळ, कंटाळलेली पोरं, घामाघूम झालेले सर, खिडकी मधून बाहेर बघत मनामध्ये वेगळीच ट्रेन हाकणारे आम्ही, अमरावतीचा हनुमान की काय मंडळाचा लांबलचक तलाव, तिकदचे ट्रॅकसुटातले ते बेष्ट खेळाडू, त्या फाड-फाड इंग्लिश बोलणाऱ्या 'नॅशनल' पोरी आणि आमची ठरलेली आणि झालेली वाईट्ट हार या गोष्टी सोडून आम्हाला आता जास्तं काही आठवत नाही, पण एक बेष्ट आठवण आहे.

टीम मध्ये स्वप्न्या नावाचं एक बारकं किडमिडं "किरानिष्ट" पोरगं होतं. स्टेशनवर रुपया टाकून वजन बघायचं रंगीत लायटींगचं चक्री मशिन त्यानी बघितलं आणि गुळवणी सरांच्या मागं लागलं ते पैशासाठी. ते मशिनपण तसलंच - गरा गरा फिरुन कसले की आवाज काढायला लागलेलं. सरांनी स्वप्न्याला वीस पैशाचं एक अल्मीन नाणं दिलं. येडं स्वप्न्या पण ते टाकून मशिनमधून तिकीट यायची वाट बघत बसलं. रुपया टाकल्याशिवाय ते तिकिट कसलं येतय बाहेर! मशिन सुद्धा आतल्या-आत पाप बिचाऱ्या स्वप्न्याची मजा बघत असणार. स्वप्न्या मात्रं रडकुंडीला आलं. सरांकडं जाउन त्यानी तक्रार सांगितली.

सर आले, त्यांनी मशिनच्या डोळ्यात डोळे घातले, झब्ब्याच्या बाह्या वरती सरकवल्या, दाढीवरुन हलका हात फिरवला आणि एका पाठोपाठ एक सल्लग तीन गुच्च्या ठेऊन दिल्या. मशिनराव गारच झाले असणार, कारण त्यांनी दोन-तीन उचक्या देउन एक-एक रुपयाची सात नाणी दणादण बाहेर टाकली! आम्ही चाटच पडलो. नंतर बाहेर भजीच्या प्लेटांवर ताव मारताना सरांनी सुरु केलं... 'अरे.. हे तर काहीच नाही... आम्ही जेंव्हा बाबरी मशिदीवर गेलो होतो ना, तेंव्हा...... यंव अन त्यंव...' आमचं लक्षच नाही. मनात वेगळीच गाडी सुरु होती. पोरं पन कुजबुजायला लागली असणार, कारण मध्येच ऐकू आलं... "हाँ.. बडबड नाही करायची!"

3 Comments:

At 5:05 AM, November 01, 2006, Blogger Nandan said...

lekh mast aahe. aavadala.

 
At 11:41 PM, November 23, 2006, Blogger Tulip said...

This comment has been removed by a blog administrator.

 
At 6:24 PM, January 21, 2007, Anonymous Anonymous said...

Ajach pahilyandaa wachali hi anudini. majeshir lekh...aawadalaa.

 

Post a Comment

<< Home