Friday, October 20, 2006

झोप

आमची झोप म्हणजे फार महाभयंकर. अतिमहाभयंकर म्हणा ना. लहानपणी तर अस्सं झोपयचो की लोक खुळे व्हायचे. बावीस-बावीस तास झोप ती. या लहानश्या बाळाला बघायला आलेले लोक चाटच पडणार. आमच्या आईसाहेबांना अश्या वेळी काय बोलावं ते समजतच नसणार. आमचे डोळे कायम मिटलेलेच. उघडायचं नावच नाही.

एक, दोन, तीन वर्षं झाली तरी आमची झोप कमी व्हायचं नावच नाही. शाळेत घालायची वेळ जेव्हा आली तेव्हा आमच्या आईसहेबांच्या मनाची काय परिस्थिती झाली असणार याचा विचार केला की आजसुद्धा गुदगुल्या होतात. शनिवारी शाळा कशी दिसते हे आम्ही कधी बघितलंच नाही. आणि आमच्या आई-बाबानी आम्हाला कधी काही बोललंसुद्धा नाही. मजा असायची पहिली काही वर्षं! त्या धन्यं शाळेमधले शिक्षक देखिल धन्यंच. समजून घ्यायचे आम्हाला.

त्या सुट्टीच्या दोन दिवशी, म्हणजे शनिवार आणि रविवारी, रात्रीच्या १२-१३ तास झोपेनंतर आम्ही मस्तं नाष्टा करायचो, आणि थंड गार फरशीवर एक गाल टेकवून मस्तं ताणून द्यायचो! मग चार-पाच तास तरी काही उठायचं नाव नाही! आईसाहेब महाराजांच्या आज्ञेला ऐकून आम्ही कधी उठल्याचं आठवत नाही. दुपारचं जेवण विसरुनच जायचं. मग शाळेत शहाण्या बाळासारखं जाउन आलेलं कोणीतरी दिव्यं कार्टं खेळायला बोलावण्यासाठी म्हणून यायचं, आणि आम्ही बड्या मुश्किलिनी उठायचो. गावभर बोंबलत फिरुन आलं, की चार घास खायचे, आणि परत ताणून द्यायची, ते आणि १२-१३ तास झोपण्यासाठी!

पाचवी नंतर तर शाळेला जायचच बंद झालं. त्यामुळे "गृहपाठ" वगैरे ससेमिरे आमच्या मागं कधी लागलेच नाहीत. आमच्या मित्र-मंडळींना त्यांनी फार सतावलं असणार.. ती पोरं कायम मेटाकुटीला येणार. पण आमचं साधं गुपित त्यांना कधी कळालं नाही. कदाचित त्यांना ते चांगलच कळालं असेल, पण त्यांच्या पालकांना मात्रं ते समजुन घ्यायचं नसणार. बिचारे ते - त्यांना आमचे डोळे कधी उघडे दिसले नाहीत ना!

आमच्या इंजिनीअरिंगच्या दिवसांमध्ये तर कहरच झाला. कधी-कधी "उठ" म्हणणाऱ्या आमच्या आईसाहेब तिकडे न्हवत्या. मग आमची शिंग इतकी मोठी झाली, कि तिकडे कुंभकर्णाच्या स्वप्नांमध्ये सुद्धा त्याला ती टोचायला लागली असणार. झोपेतले वेगळे विचार आणि बाहेर घडणाऱ्या गोष्टींचा आम्हाला काही ताळमेळ लागेना. कधी कुणाला काय बोललो, ते खरच कि स्वप्नात ते कळायचं नाही. कसं-बसं सांभाळून घ्यायचो आम्ही. आमच्या शब्दांत सांगयचं झालं तर 'लई बोंबाबोंब' व्हायची तेंव्हा.

आणि आता चाकरी करताना कळतं कि ते दिवस कसे विलक्षण होते ते. आता फार मुश्किलिनं आम्हाला ९-१० तास झोप मिळते. कधी कधीच आम्ही कॉम्प्युटरच्या समोर डोळे हळूच मिटुन घेउन ते सोनेरी दिवस आठवतो, आणि ९-१० तासांमध्ये १५ मिनिटांची केविलवाणी भर घालतो. मध्ये एकदा सुट्टी टाकून घरी गेलो होतो तेंव्ह्या आईसाहेब आमच्या बरोबर चुकुन एक मोठ्ठी पैज हारल्या. मी म्हणालो - 'पुढ्चे सहा दिवस "ऊठ" हा शब्दं उच्चारायचा नाही'!

आईसाहेबांनी आमच्यासमोर कदाचित हात टेकले असावेत, पण ते बघायला आम्ही जागे असलो तर ना!

2 Comments:

At 10:00 PM, October 22, 2006, Blogger Gayatri said...

:D

 
At 3:54 PM, March 28, 2009, Blogger Dk said...

hahaha

 

Post a Comment

<< Home