Thursday, April 27, 2006

वादळ

आज सकाळी ऑफिसला येताना Indian Robin (भारतिय दयाळ) चं दर्शन झालं. पठ्ठ्या गवतात आंघोळ करत होता... मला त्याचा फार हेवा वाटला. गुडगावासारख्या महाभयंकर गरम प्रदेशात सक्काळी सक्काळी देखिल उकाडा म्हणजे विचारु नका. त्यातंच आठवड्याचा हा मधला दिवस. त्यामुळं भर सकाळीच office मध्ये घालवायच्या असलेल्या दहा तासांच्या विचारानी डोस्कं उठून ठणा-ठण घंटा-बिंटांची बडवा-बडवी आत सुरु झालेली. आणि हा छोटू मात्रं निव्वान्तपणे स्नानाची मजा लुटत होता. एक मिनिट वाटलं कि एक दगड टाकून उडवुन लावावं त्याला. पण सद्सदविवेकबुद्धी नामक कळ डोक्यात वाजायला लागली. आता कळ आहे म्हणजे थांबणं तर भागंच. थांबलो.

आता थांबलोच आहे तर बघुया म्हंटलं काय करताहेत टिक्कोजीराव.. तर त्यानी जरा माझ्याकडं बघितल्या-नं-बघितल्यासारखं केलं आणि गेले की हो उडून! पण आमचा ego त्याला ऐकतोय होय! आम्ही सुद्धा बसलो ठाण मांडून तिथं. आणि मग एक एक गोष्टी लागल्या मनात यायला.

तर हा दयाळ म्हणजे आमच्या खास दोस्तांपैकी एक असलेला. तसं बघायला गेलं तर सगळेच पक्षी म्हणजे आमचे लहानपणापासूनचे जिवलग दोस्त. ते चड्डी घालत नाहीत ही गोष्टं वेगळी! ...आणि नाहीतर परक्याला बघुन आमच्यासारखं कोणी थांबेल का? आणि परक्याबद्दल असलं कोणी बोलेल का? म्हणजे दोस्तंच ना आपला तो. लगेच कळी खुलली आमची.. ते पक्षीनिरिक्षणाचे दिवस आठवले. भारलेले दिवस. सायकली काढून, दहा दहा किलोमिटर दामटून Pheasant Tailed Jacana आणि Ashy Wren Warblers च्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर येण्याची दहा दहा दिवस - दहा दहा तास रोज वाट बघण्याचे दिवस. परवडत नसताना nikkon च्या binoculars साठी अवाजवी हट्टं करायचे दिवस. Flamingos साठी केलेल्या मायणीच्या सहलींचे दिवस. टिटव्यांची घरटी शोधताना दोन दोन टिटव्यांकडून खालेल्या माराचे दिवस. गरुडासारख्या अवाढव्य पक्ष्याशी देखिल खास दोस्ती केल्याचे दिवस. त्याच्या इवल्याश्या पिल्लांना कच्या मटणाचा एक एक घास भरवल्याचे दिवस, आणि त्या मटणाच्या मागे "बामण" दोस्तांना बाटवल्याचे दिवस. पावसाळी सहलींच्या वेळी camera आणि binoculars डोक्यावर घेउन पुरच्या पाण्यात ओढे पार केल्याचे दिवस. सालीम अलींची भक्ती-भावानी पूजा केल्याचे दिवस. त्यांच्या अद्भुत गोष्टी खुळं होउन ऐकल्याचे दिवस. The book of Indian Birds (किंमत केवळ तिनशे रुपये!) साठी मामा-आजोबांच्या मागे वेड्यासारखे लागल्याचे दिवस. कुठल्यातरी एका सहलीच्या वेळी एस.टी मध्ये कुण्या एका पाच वर्षांनी मोठ्ठ्या मैत्रिणीनी म्हंटलेल्या "अजिब दास्ताँए है ये.." गाण्यासाठी तिच्या प्रेमात पडण्याचे दिवस. हरवलेल्या नोंदवह्यांसाठी रात्रं-रात्रं रडल्याचे दिवस.

असं काही-बाही आठवून मनात कालवा-कालव सुरु झालेली. सगळं जग उलटं सुलटं फिरायला लागलेलं. नोंदवह्यांसारखे हे मित्रं आणि या आठवणी सुद्धा हरवतील काय असं काहीतरी वाटायला लागलं. थोडं मोठं झाल्यावर bird-watching च्या बदललेल्या definitions आठवल्या. मित्रांनी केलेल्या चेष्टा आठवल्या. office मध्ये वाट पहाणाऱ्या colleagues आणि boss चे 'सॅड' चेहेरे आठवले. मग परत सगळं जग तसंच उलट्या दिशेत फिरलं, आणि एकदम वादळ शांत झाल्यासारखं झालं. ऑफिसला जायला पाहिजे हे लक्षात आलं. दयाळसाहेब तिथेच बसलेले होते. त्यांना म्हटलं "परत भेटू. मी fighter आहे".

त्यांनी फक्त हसून अंगाला एक मस्तं झटका दिला.

Friday, April 21, 2006

विमान विमान पैसा दे!

ही एक माझी लहानपणीची आठवण आहे... आम्ही सहा-सात वर्षाचे असू. आमच्या घराच्या परड्यात एक खर्र-खुर्रं मोठ्ठंच्या मोठ्ठं विमान पडलेलं होतं. ते तिथं बरिच वर्षं पडलेलं असावं, कारण जेंव्हापासून आम्हाला आठंवतय तेंव्हापासून ते तिथेच 'पडिक' होतं. मग माझा माज म्हणजे काय विचारुच नका!! आम्ही 'लई' तोरा दाखवणार आमच्या दोस्त लोकांमध्ये :) दोस्त मंडळी सुध्दा वाईट्ट चाट पडणार. 'आईला... ओज्याच्या घरात विमान आहे राव' सगळी खुळी होऊन होऊन विमानाच्याच गप्पा मारणार!

मी म्हणजे आधीच जरा विचित्र माणूस. मनात ईमले बांधणारा. हे असलं काहीतरी खाद्यं मिळालं म्हणजे तर काही विचारुच नका. आमचे बाबा म्हणजे तर एक विलक्षण माणूस. त्यामुळं हे त्यांचच काहितरी काम असणार अशी आमची पक्की समजूत झालेली. त्यामुळे तर त्यांच्या बाबतचा आदर द्विगुणित म्हणतात तो की काय झालेला. असं ते विमान. दुपारच्या चान्दण्यात देखिल जाऊन ते आम्ही बघणार. असले आम्ही येडपट.
अगदी परवा-परवा पर्यंत मला या गोष्टीची फार मजा वाटायची. गूढ प्रकार हो. अशी ती आठवण. काही दिवसापूर्वी जेंव्हा मी घरी गेलो होतो तेव्हा सहजच हा विषय निघाला माझ्याकडून. हे असलं सगळं परिकथे-टाइप वर्णन ऐकून आई आणि बाबा हसून खूळे झाले पाक. तर खरी गोष्टं अशी, की आमचे एक धन्यं शेजारी (सावंत त्यांचं नाव - आम्ही त्यांना "सावता माळी" म्हणून ओळखणार!) कधीतरी बाबा आदमच्या काळात निवडणूकीला उभे राहीलेले. त्यांचं चिन्हं होतं विमान!! तर या महाभाग माणसानी एक खऱ्या-खुऱ्या विमानाच्या आकाराची प्रतिकृती तयार केलेली म्हणे, आणि ती गाडीच्या वर लावून गाडी गावभर फिरवलेली!! आता बोला. असली सगळी मजा. मी सुद्धा तेव्हा हसून लोळलो वगैरे, पण आता जेंव्हा मी त्या गोष्टीचा विचार करतो तेंव्हा मला फार वाईट वाटतं. आईनी "आतली गोष्टं" सांगितल्यावर सगळा charmच निघून गेला राव. छे.

"विमान विमान पैसा दे" असं पोरं जे लहानपणी म्हणतात ते काय असतंय ते मात्रं चांगलंच कळालं :)

Thursday, April 20, 2006

श्रीगणेशा

भाषेच्या संदर्भात बोलायच झालं तर मी चार वेगवेगळ्या विश्वांमध्ये वावरतो. एक माझी normal मराठी, एक माझी अस्सल कोल्हापूरी मराठी, एक normal english आणि एक special BITSian english!!

या दोन normal भाषा सोडल्या तर बाकीच्या दोन अतिशय "characteristic" भाषा आहेत. त्या "geographic indiactions" ची उत्तम उदाहरणे म्हणता येतील. त्या मला अतिषय प्रिय आहेत, म्हणून हा ब्लॉग मुख़्यतः अस्सल कोल्हापूरीत असणार आहे.

हाय काय अन नाय काय! नाद खूळा अन गणपती पूळा!! जाऊन्दे झाडून!!